कर्जत-जामखेड व बारामती विधानसभा निवडणुकीत पवार विरुध्द पवार
कर्जत जामखेडमध्ये अजितदादा-राेहित तर बारामतीमध्ये युगेंद्र-जय पवार उभे राहण्याची शक्यता
मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कर्जत-जामखेड या माझ्या मतदारसंघात अजित पवार रिंगणात उतरू शकतात, असा दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही काका विरूध्द पुतण्या असा सामना होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यात येत आहे. यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात महायुतीकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात माझ्या विरोधात अनेक उमेदवार उभे राहू शकतात. तसेच माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उभे करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. भाजपाचा एखादा मोठा नेताही माझ्या विरोधात उभा राहु शकतो.
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्याचा निर्णय चुकला, अशी कबुली दिली. त्यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्राकाकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असू शकत नाही ही आम्हाला खात्री होती.
या विधानसभा निवडणुकीत बारामतीत कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय शरद पवार घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. तरी राजकीय वर्तुळात मात्र विधानसभा निवडणुकीत भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत होण्याची चिन्ह आहेत. बारामतीमधून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे जयंत पाटील यांनी संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जय पवारांना उतरवण्याच्या प्रश्नावर मोठं विधान केलं आहे.
‘बारामतीमधून मी सात-आठ वेळा लढलोय, मला इंटरेस्ट नाही, कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारला संधी देऊया’, असं म्हणत बारामती विधानसभेबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार उमेदवार असण्याची शक्यता आता स्पष्ट होताना दिसत आहे. तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते.