कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता लवकरच शिंदे गटात, उदय सामंत यांचा दावा

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) गटात खदखद असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे ( ठाकरे गट ) माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज आहेत. दुसरीकडे पक्षातील कारभारावरून शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजन साळवी हे भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेच्या मार्गावर आहेत, असं सांगितलं जाते. दुसरीकडे भास्कर जाधव यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती.
त्यातच आता उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. “पुढील आठ दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार आहे,” असं सामंत यांनी म्हटलं आहे. “आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता आम्ही खरे शिवसैनिक वाटू लागले आहोत,” असा टोला देखील सामंत यांनी लगावला आहे.
पक्षफुटीनंतर भास्कर जाधव आणि राजन साळवे दोन्ही नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर गद्दार म्हणून हल्लाबोल केला होता. यातच सामंत यांनी लगावलेला टोला आणि केलेल्या दाव्यामुळे भास्कर जाधव की राजन साळवे ‘हा’ बडा नेता कोण, अशी चर्चा रंगली आहे.
उदय सामंत म्हणाले, “18 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जात आहेत. मी 19 तारखेला दावोसला जात आहे. मी 24 तारखेला परत येत आहे. 24 तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठा नेत्याचा पक्षप्रवेश पुढील आठ दिवसांत आमच्या पक्षात होणार आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता आम्ही खरे शिवसैनिक वाटू लागले आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेस झालेली दिसेल.”
“शिवसेनेची तीन वर्षांपूर्वी काँग्रेस झाल्यानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उठाव केला होता. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत आहोत. भास्कर जाधव यांची कुचंबणा जी होत आहे, ती तीन वर्षांपूर्वी आमची झाली होती. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात भास्कर जाधव यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, तर ते मौलिक असणार आहे. भास्कर जाधव यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा आम्हाला सर्वांना मिळाला, तर ते सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांन दिली.
राजन साळवी का नाराज?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला होता. यानंतर पक्षातील नेत्यांनी विधानसभेला काम केले नसल्याचा आरोप साळवी यांनी केला आहे. तसेच, चौकशांचा सरेमिरा, पाच वर्षे विरोधी पक्षात बसावे लागत असल्यानं राजन साळवी हे पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधवांनी पक्षाला सुनावलं..
चिपळूण येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठकीत झाली. या बैठकीत भास्कर जाधवांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचत पक्षाच्या भूमिकेवर स्पष्ट मत मांडलं होते. यावेळी माजी खासदार विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुख संजय कदम सुद्धा उपस्थित होते.
“शिवसेनेची जवळ-जवळ काँग्रेस झाली आहे. जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरे पद दिले जाते. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करावा,” असा सल्लाही जाधवांनी विनायक राऊतांना दिला.