पंतप्रधान मोदी म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञान… अकोला सभेतील आरोपावरून ठाकरे गटाची टिका

अकोल्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमली पदार्थांच्या पैशांतून काँग्रेस निवडणूक लढवत आहे. युवा वर्गाला व्यसनाच्या नादी लावून आलेल्या पैशांमधून काँग्रेसला निवडणुका लढवायच्या आहेत, अशा गंभीर आरोप केला. या आरोपावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
शनिवारी पंतप्रधान मोदींनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधला. मात्र या भेटीदरम्यान मोदींसोबत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोडही उपस्थित होते. मोदींनी भाषणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भात केलेल्या विधानांचा समाचार घेतानाच राठोड यांच्या मुद्द्यावरुन ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे.
“महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण गाजले. या ललित पाटीलशी ‘मिंधे-फडणवीस’ मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा थेट संबंध आहे. ललित पाटीलला ससून इस्पितळातून पळून जाण्यासाठी या मंत्र्यांची मदत होती. महाराष्ट्राचे मोदीपुरस्कृत सरकार ‘ड्रग्ज’च्या पैशांनी बरबटले आहे व मोदी-शहा या सरकारचे संरक्षक कवच बनले आहेत, पण पंतप्रधान मोदी दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान शिकवत आहेत,” असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
अकोल्यातील सभेत त्यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या पैशांतून काँग्रेस निवडणूक लढवत आहे. दिल्लीत हजारो कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले. त्या प्रकरणी मुख्य आरोपी काँग्रेसचा एक नेता आहे. युवा वर्गाला व्यसनाच्या नादी लावून आलेल्या पैशांमधून काँग्रेसला निवडणुका लढवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य गंभीर आहे व या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास व्हायलाच हवा. पंतप्रधानांना देशातील युवकांच्या व्यसनाधीनतेची चिंता आहे हे ऐकून बरे वाटले, पण तरुण वैफल्यग्रस्त होऊन व्यसनाधीन का बनत आहे? याचे उत्तरही पंतप्रधानांनी द्यायला हवे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“मोदी काल पोहरादेवीत होते. त्या व्यासपीठावर मिंधे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड मोदींच्या चरणाशी बसले होते. या महाशयांवर खून, विनयभंग, बळजबरी असे आरोप पूजा चव्हाण या तरुणीने केले व एक दिवस तिने आत्महत्या केली. ही नक्की हत्या की आत्महत्या, हे रहस्य आहे. देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती. राठोड यांचे त्या तरुणीकडे जाणे-येणे होते, असे आरोपही तेव्हा झाले होते. त्या महिलेच्या घरात नशेचे अनेक साहित्य मिळाले व तेच महाशय मंत्री म्हणून काल मोदींच्या चरणाशी बसले. यास ढोंग नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.