मतदार यादी पडताळणीच्या कामास टाळाटाळ ; पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : मतदार यादी पडताळणीच्या कामास टाळाटाळ करून नोटीसला देखील उत्तर न देणाऱ्या पाच शिक्षकांवर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. हा प्रकार ४ ते १२ जुलै दरम्यान तहसील कार्यालय येथे घडली. पी यु शाळेचे दोन शिक्षक निलेश छाबडा आणि एस आर लव्हाळे (राजाबाजार यादी), किराडपुरा मनपा शाळेच्या दोन महिला शिक्षिका (किराडपुरा यादी), आणि ब्रिजवाडीच्या सम्राट अशोक शाळेचे शिक्षक पी जे देशमुख (ब्रिजवाडी यादी) अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत.
फिर्यादी नायब तहसीलदार देविदास माधवराव खटावकर यांच्या तक्रारीनुसार, आरोपी पाचही शिक्षक हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. त्यांना मतदार यादीचे घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी ४ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला आरोपी पाचही शिक्षक गैरहजर राहिले. त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्याचा आरोपींनी तोंडी अथवा लेखी खुलासा देखील सादर केला नाही. त्यानंतर अंतिम नोटीस देऊन मतदार यादी पडताळणीचे काम करण्यास सांगण्यात आले मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. नायब तहसीलदार यांच्या कार्यालयातून आरोपी शिक्षकांना वारंवार फोन करून कामकाजाच्या सूचना देऊनही या शिक्षकांनी काहीच प्रतिसाद देईल नाही. त्यामुळे राष्ट्रीय कामकाजात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्यावरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.