मी जीवन संपवत आहे, बहिणीला फोन केला अन् रेल्वेसमोर घेतली उडी

रत्नागिरी: बहिणीला फोन करून रेल्वे पुलावरुन उडी घेत एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रत्नािगरीत घडली आहे. रक्षाबंधन अवघ्या चार दिवस आले असताना भावाने उचलल्या या पाऊलामुळे बहिणीलाही मोठा धक्का बसला आहे. सुरेंद्र राजेंद्र कीर (वय, ३८) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान सुरेंद्र याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली आहे. मडगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस समोरच त्या युवकाने रेल्वे पुलावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुरेंद्रला दारुचे व्यसन होते अशीही प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरुवारी साडेचार वाजताच्या सुमारास सुरेंद्र कुवारबाव येथील डी मार्टच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला. तिथून त्याने आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही क्षणातच त्याने रेल्वे पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली.