रोडरोमियांच्या त्रासामुळे कॉलेज तरुणीची आत्महत्या

राहुरी : देवळाली प्रवरा येथील एका कॉलेज तरुणीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान, रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केला असून, याप्रकरणी दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील जागृती विश्वास शिंदे हीने नुकतेच ११ वीच्या वर्गात प्रवेश घेऊन कॉलेजचे शिक्षण सुरु केले होते. जागृती ही क्लासला जात येत असताना काही रोडरोमिओ तीची छेडछाड करीत होते. याबाबत तीने तीच्या आईला सांगीतले. त्यावेळी तीच्या आईने रोडरोमिओंना भेटून माझ्या मुलीची छेडछाड काढू नका, तीला त्रास देऊ नका, तीला परत फोन करु नका, अशी समज दिली होती. त्यानंतरही तीची छेडछाड सुरुच होती. १४ जून रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे पुढे आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
दरम्यान, जागृतीची आई सुरेखा विश्वास शिंदे, रा. देवळाली प्रवरा यांनी शुक्रवारी राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहुन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून देवळाली प्रवरा येथील दोन साडे सतरा वर्षाच्या अल्पवयीन दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेतले. आणि त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहे.