विनेश फोगाट प्रकरणी निर्णय 16 ऑगस्टला
मुंबई : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सुवर्णपदकाच्या सामन्याआधी अपात्र ठरवण्यात आले होते. याबाबत तिने सीएएसकडे अपील केली होती. याचा निर्णय मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येणार होता. मात्र आता हा निर्णय १६ ऑगस्टला होईल.
विनेशने रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सकडे अपील केले होते. सीएएसने याबाबतीत ९ ऑगस्टला सुनावणी केली होती. या दरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघाचे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी विनेशची बाजू राखली होती. विनेशला वजन वाढल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. तिचे वजन १०० ग्रॅम अधिक आढळले होते. आता विनेशने रौप्य पदकाची मागणी केली आहे.
विनेशने सेमीफायनलमध्ये क्युबाची कुस्तीपटू गुजमान लोपेजीला हरवले होते. तर क्वार्टरफायनलमध्ये युक्रेनची ओकसाना लिवाचला हरवले होते. विनेशने प्री क्वार्टरफायनलमध्ये जपानची सुसाकीला हरवले होते. मात्र सुवर्णपदकाच्या लढतीआधी अपात्र ठरवण्यात आले होते.