वक्फ बोर्डला 10 कोटींच्या निधीचा जीआर मागे, चौकशीचे फडणवीसांचा आदेश
मुंबई : राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी दिल्याचा जीआर काढण्यात आला होता. प्रशासनाने काढलेला हा जीआर योग्य नसून त्याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर लागलीच मागे घेतला. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही, प्रशासकीय पातळीवर वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका होताच राज्य सरकारवर हा जीआर मागे घेण्याची नामुष्की आली आहे. याबाबत त्याची चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्टवर सांगितलं.
वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी हा निधी वितरित केल्याचं सांगण्यात आलं होतं. राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता.
वक्फ बोर्डला निधी दिल्याचा एक जीआर काढण्यात आला, ही प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.