क्राइम

चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत उकळले ११ तोळा सोने

अहमदनगर : अल्पवयीन मैत्रिणीसोबत केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने तिच्याकडून ११ तोळ्यांचे दागिने व रक्कम असा सात लाख १० हजार रुपयांचा ऐवज उकळला. तसेच तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी रेहान राजू शेख (रा. तपोवन रस्ता, सावेडी) याच्याविरूध्द विनयभंग, पोस्को आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलच्या फोन पे मधील ट्रांजेक्शन व घरातील कपाटाची चावी सापडत नसल्याने त्यांनी पत्नी व मुलीकडे चौकशी केल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची कबुली दिली आहे.

फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय १३) क्लासला जात असताना एका मेकॅनिक दुकानात काम करत असलेला रेहान शेख तिचा पाठलाग करत होता. दोन ते तीन महिन्यांपासून ते सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर बोलत होते. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सावेडी उपनगरातील एका कॅफेत त्यांची भेट झाली तेव्हा रेहान याने मुलीसोबत अश्लिल चाळे केले होते.

९ सप्टेंबर रोजी सायंकाळी रेहान याने मुलीला ‘माझी आई आजारी आहे, माझ्या घरी कोणी नाही, तु तुझ्या वडिलांना न सांगता मला पैसे दे, तु मला पैसे दिले नाही तर तुझी व माझी इंस्टाग्राम चॅटींग मी तुझ्या आई वडिलांना पाठविल’ अशी धमकी दिली होती.

धमकीला घाबरून पीडिताने वडिलांच्या मोबाईलवरून रेहानला पैसे पाठविले. त्यानंतर देखील त्याने पीडितेकडे वारंवार पैशाची मागणी केली असता तिने यु. पी. आय व्दारे त्याला पैसे पाठविले होते. त्याने पीडितेच्या आईचे घरातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली असता पीडिताने तिच्या आईचे कपाटात ठेवलेले आठ तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याचे टॉप्स, पाच ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅमच्या तीन नथा, पाच ग्रॅमचे दोरा गंठण तसेच पाच ग्रॅमची चेन असे सुमारे ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने रुमालात बांधून घराच्या बालकनीतून रेहानला दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button