नाव-गाव विचारून २३ जणांना घातल्या गोळ्या
पाकिस्तान या धक्कादायक घटनेने हादरला

इस्लामाबाद : वाहनाच्या खाली जबरदस्तीने उतरायला लावून अतिरेक्यांनी तब्बल २३ जणांना गोळ्या झाडून ठार केलंय. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील मुसाखैल जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. सोमवारी (२६ ऑगस्ट) ही घटना घडली.
दहशतवाद्यांने प्रदेश, वांशिक माहिती विचारून गोळीबार केला. मुसाखैल जिल्ह्यात काही लोक ट्रक, व्हॅनमधून प्रवास करत होते. यावेळी अचानकपणे काही अतिरेक्यांनी येत या लोकांना थांबवले आणि त्यांची वांशिक माहिती विचारली. जे लोक पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील होते, त्यांनाच गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आहे. या गोळीबारात एकूण २३ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर एकूण पाच जण जखमी झाले. हा महामार्ग पंजाब आणि बलुचिस्तान यांना जोडतो.
लोकांवर हल्ला झालेल्या या प्रांतात बीएलए (बलुच लिबरेशन आर्मी) ही सक्रिय असलेली अतिरेकी संघटना आहे. यामागे याच संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या अतिरेक्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना योग्य ती शिक्षा होईल, असे आश्वासन सरफराज बुगती यांनी दिले आहे. या घटनेचा संपूर्ण पाकिस्तानात निषेध व्यक्त केला जातोय.