महाराष्ट्रराजकारण

शहाण्याला शब्दाचा मार असतो… ‘समोरासमोर या’ अजित पवारांच्या आव्हानाला सुषमा अंधारेंचा शाब्दिक मार

मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून सत्ताधारी आिण विरोधकांत चांगलीच जुंपली आहे. विरोधकांनी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरला होता. या घटनेनंतर महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. या आंदोलनानंतर विरोधकांवर निशाणा साधताना हिंमत असेल तर समोर या, आमच्या प्रतिमांना जोडो काय मारता? असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यांच्या या आव्हानाला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणतात की हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन जोडा मारा. खरं तर शहाण्याला शब्दाचा मार असतो. पण ज्या धतिंगगिरीवाल्यांच्या आशीर्वादाने तलवार-बंदूक-कोयता गँगचा हैदोस सुरू आहे त्यांना शब्दांची किंवा सांकेतिक भाषा कशी कळावी? अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच जनता आता येत्या विधानसभेला मतपेटीतून जोडे मारेल, असा पलटवारदेखील सुषमा अंधारे यांनी केला.

काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सोमवारी बारामती येथे होती. कोणत्याही सरकारच्या काळात एखाद्या महापुरुषाचा पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहे. अशावेळी कोणत्याही विरोधकांनी दुर्दैवी घटनेचे राजकारण करता कामा नये. परंतु आमच्या विरोधकांनी आमच्या प्रतिमांना जोडे मारले. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीमध्ये केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button