तुळजापूर विधानसभेत शिंदे गटाकडून ॲड.योगेश केदार उमेदवार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

धाराशिव (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार गावागावात जाऊन भेटी-मेळावे घेत आहेत. दरम्यान आता महायुतीकडून त्या-त्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार याबाबतची चाचपणी सुरु झालेली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड.योगेश केदार यांचे नाव सध्या चर्चेत आहे.
सामाजिक चळवळीतून महाराष्ट्रभर नावारूपाला आलेला चेहरा म्हणजेच ॲड.योगेश केदार यांनी जिल्ह्यातील विकास कामे मंजूर करून आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. मराठा समाजाची आरक्षण चळवळ पुन्हा उभी करण्यात त्यांच्या वनवास यात्रेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मराठा समाजात त्यांच्या विषयी मोठी आत्मीयता आहे. सध्या मराठवाड्यात प्रस्थापित मराठा विरूध्द विस्थापित असा लढा सुरू आहे. त्या समीकरणात प्रस्थापित राणा पाटील हे बसत नाहीत. मात्र त्या समीकरणात योगेश केदार हे अचूक बसतात अशी चर्चा आहे. केदार हे हमाली केलेल्या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातून आहेत. योगेश केदार यांच्या आई रोजंदारीवर काम करतात.
जातीय समीकरणात ते मराठा असले तरी मागच्या पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून धाराशिव येथील धनगर समाजाचे उपोषण त्यांनी यशस्वी पद्धतीने सोडवले. थेट आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांचे फोनवर बोलणे करून दिले. मराठा समाजातील या तरुण नेत्याने धनगर बांधवांची मने जिंकली. ओबीसी-मराठा दोन्ही समाजात त्यांचे राजकीय प्रस्थ चांगलेच वाढले आहे. तेर येथील गोरोबा काका समाधी मंदिरास (अ) वर्ग दर्जा मिळवून देण्यात भूमिका निभावली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संधान बांधून ओबीसी बारा बलुतेदार समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा पुण्यात सत्कारही झाला होता.
सध्या मराठवाड्यात विस्थापित मराठ्यांची चळवळ अत्यंत संवेदनशील झालेली आहे. त्यातून एक विस्थापित चेहरा देऊन संपूर्ण मराठवाड्यात वेगळा संदेश देण्याची भूमिका मुख्यमंत्री घेऊ शकतात, अशी कुजबुज आता तुळजापूर मतदारसंघात सुरु आहे. गल्ली ते दिल्ली दांडगा संपर्क असलेले योगेश केदार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध वेळोवेळी दिसून येतात. दिल्लीत देखील त्यांनी दहा-बारा वर्षे काम केल्याने दिल्ली दरबारी देखील त्यांची चांगली पोहोच दिसून येते. छत्रपती संभाजीराजेंनी या कर्तबगार तरुणाचे गुण हेरून २०१९ विधानसभेचे टिकिट देखील मागितले होते.
राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. धाराशिव कळंब मतदारसंघ ओमराजे आणि तानाजी सावंत यांनी सोडण्यास नकार दिल्याने पाटील यांना तुळजापूर येथे टिकिट दिले गेले. अन्यथा योगेश केदार यांनी त्यावेळीही मतदारांमध्ये कुतूहल निर्माण केले होते. त्यानंतर सलग त्यांनी कामे करत राहिल्याने पुन्हा ते चर्चेत आले आहेत.
धाराशिव शहरात १४० कोटी रुपये विकास निधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यातून आणला. संपूर्ण मराठवाड्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अन् तो यशस्वी देखील होण्याच्या मार्गावर आहे.
सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग त्यांच्या पाठपुरावा मुळेच मंजूर झाला आहे. २०१८ मध्ये तशा बातम्याही पत्रकारांनी केल्या होत्या. नंतर ते रेल्वे समितीवर सदस्य देखील राहिले. अन् उर्वरित अडचणी सोडवून मंजुरी आणली. सोलापूर तुळजापूर धाराशिव हा प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांचे असलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. धाराशिव शहरात पासपोर्ट कार्यालय देखील त्यांचीच देण आहे. अशी अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत.
लाडकी बहिण योजनेतील त्रुटी ओळखून सरकार कडून त्याप्रमाणे उपाय योजना त्यांनी करून घेतल्या. सारथी,बार्टी, महाज्योती या सर्व जातींच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात त्यांनी भूमिका निभावली. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षित तरुण पिढीमध्ये त्यांच्याकडे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. महावितरण असेल किंवा एमपीएससी परीक्षांच्या तारखा वाढवून घेत त्यांनी तरुणांना दिलासा दिला आहे. एसटी कामगारांना महावितरण प्रमाणे पगारवाढ मिळावी यासाठी देखील त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिल्याने बहुजन समाजात देखील त्यांनी आपुलकी मिळवली.
तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी या छोट्याश्या खेडेगावातून शेतमजूर असलेल्या कुटुंबातून येणारे योगेश केदार हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदयाला येत आहे. अशा कर्तबगार तरुण चेहऱ्याला विधानसभा निवडणुकीत संधी देऊन एकनाथ शिंदे हे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याच्या बेतात आहेत.
त्यांच्यापुढे तुळजापूर मतदारसंघ पुन्हा धनुष्यबाणाकडे सोडवून घेण्याचे खरे आव्हान असेल. विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर येथे ऐनवेळी आलेले आयात उमेदवार आहेत. त्यांचा मूळ मतदार संघ हा धाराशिव कळंब असून ते पुन्हा आपल्या मूळ मतदारसंघात गेले तर ही तुळजापूर ची जागा शिवसेनेला सहज सुटू शकते. १९९५ मध्ये बाळासाहेबांनी तुळजापूर वर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहिले होते. स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे एकनाथ शिंदे हे तुळजापूर वर दावा करू शकतील अशी चिन्हे आहेत.