महाराष्ट्रराजकारण

सामना पाठोपाठ आता अमोल कोल्हेकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक

सध्या विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत असताना दिसत आहे. नुकतेच शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेल्या जिरेटोप देऊन डोक्यावर परिधान करण्याची विनंती फडणवीसांना केली. मात्र, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास फडणवीस यांनी नम्रपणे नकार दिला. त्यांच्या याच कृतीचे सध्या सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एक्स पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे. “जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की, जिरेटोप डोक्याला लावत फडणवीसांनी तो संतांकडे परत केला. मान्यवरांनी आग्रह केल्यानंतरही फडणवीसांनी विनंतीपूर्वक नकार दिला. तसेच, आपण छत्रपतींच्या मावळ्यासमान असल्याची प्रतिक्रिया देत जिरेटोप परिधान न करता त्याला नमन केल्याचं पाहायला मिळालं.

अमोल कोल्हे यांनी केले फडणवीसांचे कौतुक
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कृतीचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कौतुक केले आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी आहे,’ असे अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हंटले आहे.

प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना घातला होता जिरेटोप
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल १५ मे २०२४ रोजी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरोटोप घातला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवप्रेमींनीही प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीवर टीका केली होती. ज्यावरून वाद निर्माण झाला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button