‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावरुन अजित पवारांचे भाजपसोबत मतभेद
मुंबई : सध्या महायुतीच्या नेत्यांकडून ‘एक है तो सेफ है’ ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावर जोर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी नेत्यांची मोठी फौज सध्या मैदानात आहे. अशातच योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली आहे. या घोषणावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. विरोधकांकडून या घोषणेला विरोध झालाच, मात्र महायुतीचे महत्वाचे घटक असलेल्या अजित पवार यांनीही या घोषणेला विरोध केला आहे.
‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणा उत्तर प्रदेश किंवा झारखंडमध्ये चालतील, महाराष्ट्रात ते चालणार नाही अशी स्पष्ट भूमिक अजित पवार यांनी घेतली होती. अजित पवार म्हणाले होते की, या गोष्टी इथे चालत नाही, इतर राज्यात चालतात. ते इतर राज्याचे नेते आहेत भाजपचे, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय बोलावं ते त्यांचं मत आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना मानणारा पक्ष असल्याचं अजित पवार वारंवार सांगत असतात.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटेंगे तो बटेंगे ही घोषणा दिली होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’ हा नारा दिला. या घोषणेबाबत महायुतीने राज्यातील वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर या घोषणेची जाहिरातही दिसली. या जाहिरातीमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांचे चिन्ह आहेत. तसंच राज्यातील वेगवेगळ्या समाजाच्या वेशभुषेवर घातल्या जाणारे फेटे, पगड्या, टोप्याही यामध्ये दिसतात.