जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, ‘बटेंगे तो कटेंगे’वरून फडणवीसांचा टोला
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे ही उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी यांची घोषणा मोठा प्रमाणात वापरली आहे. अनेक ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ घोषणा दिल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. या घोषणेला विराेधी पक्षाबरोबरच अजित पवार तसेच भाजपच्याच पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांनी विरोध केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला विरोध केला होता. अजित पवार म्हणाले की, “अशा गोष्टी महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते.
त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आमच्या रक्तात आहेत आणि आम्ही त्याच मार्गावर जाऊ. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याचा स्वीकार करणार नाही,” असे अजित पवार म्हणाले होते.
मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा-जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला.
त्यामुळं ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चाललं आहे. जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर संपावं लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितलं आहे की ‘एक है तो सेफ है’ ,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.