लोखंडी साखळीने विदेशी महिलेला जंगलात बांधले, किंचाळण्याचा आवाज अन् गुराख्यांच्या सतर्कतने प्रकार उघड

सावंतवाडी : सावंतवाडीतील रोणपाल- सोनुर्ली येथील घनदाट जंगलाच्या मधोमध एका विदेशी महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी शेतकरी व गुराख्याच्या जागरूकतेमुळे प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. गेल्या दोन-तीन दिवस मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असल्याने या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोणपाल- सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसतानाही एवढ्या आतमध्ये तिला कसे व कोणी आणले हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहिले असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने महिलेची लोखंडी साखळीतून सुटका केली. गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही महिला पावसात भिजल्याने तिच्या हातापायांना सुज आली आहे. महिला बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता. तिच्याकडे काही कागदपत्र आढळून आली असून त्यात तिचे नाव ललिता कायी कुमार एस असे आहे, ती तामिळनाडूमधील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचे स्पष्ट झाले.