पाकिस्तानात आयोजित शिखर परिषदेवर दंगली सावट, लष्कर केले तैनात

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कुर्रम आदिवासी भागात जमिनीच्या वादावरून शिया आणि सुन्नी समाजामध्ये वाद पेटला आहे. गेल्या आठवडाभरात या संघर्षात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या दहशतवादग्रस्त कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महिनाभरापूर्वीच येथे युद्धविराम करार झाला होता. असे असूनही येथे रक्तरंजित संघर्ष थांबू शकला नाही.
यातच पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतू तेथील परिस्थिती पाहता भारत, रशिया, चीनसह विविध आशियाई देशांचे प्रतिनिधी येणार असल्याने काही अघटित घडायला नको म्हणून पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये सैन्य तैनात केले आहे.
भारताचे प्रतिनिधी मंडळ पाकिस्तानला पोहोचले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही काही वेळात पाकिस्तानला रवाना होणार आहेत. इराण, रशिया, चीनचे प्रतिनिधी मंडळ देखील पोहोचले आहेत. अशातच पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती ठीक नसल्याने सैन्याची तैनाती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये पुढील काही दिवस लग्न समारंभ, आंदोलने आदींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्य, गुप्तचर यंत्रणा आणि रेंजर्सचे जवान ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. ९००० पोलिसांना इस्लामाबादसह आजुबाजुच्या शहरांमध्ये तैनात करण्यात आल्याचे पोलिस प्रमुखांनी सांगितले आहे.
इस्लामाबाद, रावळपिंडीसह आजुबाजुच्या शहरांत आंदोलनांना तसेच रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच माजी पंतप्रधान इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इंसाफने इम्रानविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानात काही भागात दंगे सुरु झाले आहेत. या परिस्थितीवर पोलीस प्रशासन ताबा ठेवू शकत नसल्याने आता लष्कराने ताबा घेतला आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांताचे गव्हर्नर फैसल करीम कुंडी यांनी सांगितले की, शुक्रवारीही रक्तरंजित चकमकी झाल्या ज्यात अनेक लोक मारले गेले. ही भांडणे जमिनीवरून सुरू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जेव्हा अप्पर कुर्रम भागातील बोशेहरा शिया लोकांनी सुन्नी अहमदझाई समुदायाच्या लोकांच्या जमिनीवर बंकर बांधण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचा विरोध सुरू झाला. यानंतर हिंसाचाराची आग संपूर्ण परिसरात पसरली आणि अनेक घरांना आग लागली. ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये काठ्या, रॉड आणि दारूगोळा वापरण्यात आला, ज्यामध्ये डझनभर लोक मारले गेले. मात्र, सुमारे 10 वर्षांपासून येथे शिया आणि सुन्नी यांच्यात तणाव आहे.