महाराष्ट्रराजकारण

अनिल देशमुखांवरचा हल्ला म्हणजे ‘फेक दगडफेक’ : फुके

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. याच आरोपांना आता भाजपचे नेते परिणय फुके यांनी उत्तर दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

परिणय फुके यांनी आज सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा संशय व्यक्त केला. देशमुखांवरील हल्ल्याबाबत बोलताना परियण फुके यांनी,”अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला ‘फेक दगडफेक’ आहे. सगळं स्क्रीप्टेड झालं असं दिसत आहे. पोलिसांनी तातडीने एसआयटी नेमून याप्रकरणाची चौकशी सुरु करावी” अशी मागणी यावेळी त्यांनी केली. त्यासोबतच उद्याच्या मतदानावर याचा परिणाम होणार नाही. चौकशीत सत्य बाहेर आले पाहिजे. सलील देशमुख यांचा पराभव होत असल्याने अनिल देशमुख यांनी स्वतःवर ‘फेक दगडफेक’ करून घेतली असल्याचा परिणय फुके यांनी केला आहे.

त्यासोबतच परिणय फुके यांनी घडलेल्या घटनेविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग कमी का होता? अनिल देशमुख यांच्यासोबत 10 वर्षांपासून सोबत असणारा बॅाडीगार्ड नेमका कालच मागच्या गाडीत का बसला होता? घटनेनंतर बॅाडीगार्ड तिथे वेळेत का पोहोचला नाही? त्यांनी आरोपींवर फायरिंग का केली नाही? गाडीवर आढळलेला 10 किलोचा दगड फेकून मारणं शक्य आहे का? 10 किलोचा दगड जवळ येऊन गाडीवर टाकलेला दिसतोय. 10 किलोचा दगड 20 फुटांवरून कसा फेकला जाऊ शकतो? दगड कारच्या काचेच्या खाली ठेवलेला दिसतोय, असे परिणय फुके यांनी म्हटले.

तसेच पुढे बोलताना परिणय फुके यांनी,”अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हा निवडणुकीत हारणार, हे दिसत असल्याने अनिल देशमुख असं काहीतरी करतील, हे भाकीत मी काटोलच्या सभेत वर्तवविले होते. विदर्भात महाविकास आघाडीचे बरेच मोठे नेते पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे तेही अनिल देशमुखांप्रमाणे करु शकतात. पोलिसांनी याची दखल घ्यावी. अशाच प्रकारे तुमसरमध्ये चरण वाघमारे, नाना पटोले, मध्य नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके, विजय वडेट्टीवार, गोंदियाचे काँग्रेस उमेदवार गोपालदास अग्रवाल अशाप्रकारे काही करु शकतात. आज रात्री किंवा उद्या हे पाच नेते असं काही करु शकतात, असे परिणय फुके यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button