तरुणीवर हल्ला करणाऱ्या टोळक्यांचा पोलिसांना लागेना सुगावा, बदनापूरकरांचा पोलिसांवर रोष
परवीन सय्यद | बदनापूर जिल्हा जालना
शहरासह तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून पोलिसांचा वचक न राहिल्याने पोलीस ठाण्यासमोर गुन्हेगार हल्ला करण्याची हिम्मत ठेवत असून निकळक येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या एका तरुणीवर सकाळच्या वेळी सहा अज्ञात गुन्हेगारांनी चाकू हल्ला करून विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडून चार दिवस उलटले तरी बदनापूर पोलिसांना आरोपीचा कोणताही सुगावा लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील दीड वर्षांपासून बदनापूर शहरासह तालुक्यात गुन्ह्यात प्रचंड वाढ़ झालेली आहे, गुन्हेगारांचे मनोधर्य एवढे वाढले कि, थेट पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या तर एक दोन प्रकरणात थेट पोलीस ठाण्यासमोर फिर्यादीवर जीव घेणे हल्ले झाले मात्र बदनापूर पोलिसांनी त्या गुन्हेगाराविरुद्ध कठोर पाऊले उचलली नाही हे विशेष!
बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफिया, अवैध धंदे प्रचंड वाढलेले आहेत, अनेक तक्रारी झाल्या मात्र देखावा म्हणून एक दिवस कारवाई केली जाते, पुढे सर्व अलबेल त्यामुळे तक्रार करावी तर कुठे असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो, तर काही प्रकरणात पोलिसात तक्रार करणाऱ्या व्यक्तीला अवैध धंदेवाल्याकडून टार्गेट केले जाते परंतु अश्या परिस्थितीत पोलीस बघ्याची भूमिका बजावतात, एकंदरीत गुन्हेगारावर पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याचे चित्र उघडपने दिसत आहे.
खाकी वर्दीची भीती न राहिल्याने 12 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील निकळक येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या एका अल्पवयीन तरुणी रनिंग करीत असतांना पाठीमागून तीन मोटारसायकल वर अज्ञात सहा जण आले व तरुणीच्या दुत्रफा मोटार सायकल घेत दोघांनी तिचे दंड धरून उचलून पुढे घेऊन चालले तर एक मोटारसायकल पाठीमागे होती, तिला दोनसे फुटा पर्यंत उचलून नेले दरम्यान तिने प्रतिकार करण्यास प्रारंभ करताच अन्य दोघांनी तिच्या हातावर चाकू हल्ला केला तर काहींनी पायावर वार केले व धमकी देत पळून गेले. सदर प्रकार घडल्यानंतर तरुणीने बदनापूर पोलिसात फिर्याद दाखल केली असता अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेमुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अनेक मुली अकोला, निकलक, कंडारी आदी गावातून शिक्षणासाठी बदनापूर येथे येतात मात्र या घटनेमुळे पालक मुलींना शाळा, महाविद्यालयात पाठविण्यासाठी घाबरत आहे, भर दिवसा अश्या घटना होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे, या घटनेनंतर काही संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांची कसून चौकशी केली मात्र काहीच सुगावा लागला नाही अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जैस्वाल यांनी दिली, विशेष म्हणजे गुन्हा घडून चार दिवस उलटले असतांना बदनापूर पोलीस आरोपीचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहे.
पोलिसांनी तपास कामी तिघांना ताब्यात घेतले होते त्यापैकी एकास पहिल्याच दिवशी सोडण्यात आले तर अन्य दोघांना तपास कमी विचारपूस करण्यासाठी तीन दिवसापासून पोलीस ठाण्यात थांबविण्यात आलेले आहे मात्र तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही या संदर्भात तपासिक अंमलदार ए. जी. जैस्वाल यांना विचारणा केली असता ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना सोडण्यात आलेले नाही त्यांची चौकशी सुरु आहे असे त्यांनी सांगितले.
डॉ. कल्याण काळे – खासदार
पोलीस भरतीचा सराव करणाऱया मुलीवर हल्ला होणे हे आपल्या सर्वांसाठी शरमेची बाब आहे, बदनापूर तालुक्यात पोलिसांची पकड ढिली झाली का? झाली नसेल तर आरोपीना आता पर्यंत अटक व्हायला पाहिजे होती, पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची सूचना करणार असून आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावे.संतोष सांबरे – माजी आमदार
बदनापूर तालुक्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे, बदनापूर पोलिसांचा वचक राहिलेला नाही त्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढलेली आहे, तालुक्यात अवैध धंदे देखील वाढल्याने गुन्हेगारी वाढली आहे, पोलीस अधीक्षकडे तक्रार करण्यात येणार आहे, महिला स्वतःला असुरक्षित समजत आहे त्याचे कारण बदनापूर पोलीस निष्क्रिय आहे.