देश-विदेश

कर्नाटकात गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत मारहाण, दगडफेक अन् जाळपोळ

बेंगळुरू: कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला शहरात बुधवारी गणपती विसर्जनावेळी दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर हिंसाचार झाला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गणपती विसर्जन मिरवणुकी वेळी दगडफेक झाल्यानंतर दोन गटात हाणामारी झाली. हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाची मिरवणूक नागमंगला मुख्य मार्गावरील मशिदीजवळून जात होती. यादरम्यान मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात दोन समुदायांमध्ये हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर संतप्त हिंदू समाजाच्या लोकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत जबाबदारांना अटक करण्याची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद (विहिप) आणि बजरंग दलाने आज नागमंगला बंदची हाक दिली आहे.

मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बलदंडी यांनी सांगितले की,’गणेश मिरवणूक मशिदीजवळ पोहोचल्यावर तिथून मिरवणूक निघायला थोडा वेळ लागला. त्यावरून दोन्ही समाजात वादावादी सुरू झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. लाठीचार्ज केल्यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यासमोर जाऊन निदर्शने केली. इतर समाजातील लोकही मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यांनी काही दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला असलेली दुकानेही पेटवून दिली.’

पुढे ते म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आपल्याकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. केवळ काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी परिसरात हाय अलर्ट जाहीर केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 163 (अडथळा किंवा संशयास्पद धोक्याच्या तातडीच्या प्रकरणांमध्ये जारी केलेले आदेश) लागू करण्यात आले आहे.

या घटनेचा केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी तीव्र निषेध केला. एका गटाने ज्या प्रकारे गणपतीच्या मिरवणुकीत शांततेने चालणाऱ्या भाविकांना जाणूनबुजून लक्ष्य केले, दगड आणि चप्पल फेकले, पेट्रोल बॉम्ब फोडले आणि तलवारी चालवल्या, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्याचा हा पुरावा आहे. ते पुढे म्हणाले की, पोलीस ठाण्यासमोर सुरक्षेची मागणी करणाऱ्या शांतताप्रिय आंदोलकांना त्या समाजातील असामाजिक तत्व त्रास देतात, तेव्हा आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, असा प्रश्न पडतो. स्थानिक पोलिसांच्या अपयशावरही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button