महाराष्ट्रराजकारण

शिवसेनेइतकेच मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळावे, भुजबळाची मागणी

नाशिक : शपथविधीची तारीख जवळ येत असली तरी महायुतीत मंत्रिपद वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच काही संपा संपेना. शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले असले तरी ते ग्रहमंत्रीपदावर ठाम आहे. भाजपात मात्र त्यांना हे पद देण्यावरून दुमत आहे. त्यामुळे मात्र १० दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा पेच काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यातच नव्याने होऊ घातलेल्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यावरूनही चर्चा रंगत आहे. याच चर्चेदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे सर्वाना धक्का बसला आहे.

छगन भुजबळ यांनी महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट अधिक असल्याचे बोलत शिवसेनेला जेवढी मंत्रिपद मिळतील तेवढीच राष्ट्रवादीला देखील मिळाली पाहिजेत असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी, “अजित पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत आणि तीन नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राइक रेट चांगला असून शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावीत, अशी मागणीत त्यांनी केली.

दरम्यान , महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांचे नाव आहे. याविषयी बोलताना छगन भुजबळ यांनी, “हे मी तुमच्याकडून ऐकतोय. मला देखील काही जणांनी नाव पाठवलेत पण हे सगळं अंदाज आहेत. आमचे नेते अजित दादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरं आहे. आमचे प्रांत अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत. त्यांना इकडे बोलावण्यापेक्षा दादा दिल्लीला गेले आहेत, “असे त्यांनी म्हटले. दरम्यान , अगोदरच मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरचा तोडगा निघाला नाही त्यात भुजबळांच्या या विधानाने आता महायुतीत आणखी फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button