यशश्री शिंदे खून प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश, आरोपी दाऊदला कर्नाटकातून अटक

मुंबई : यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून ताब्यात घेतले आहे. २० वर्षीय यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. गुरुवारी ती बेपत्ता झाली होती, त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळीतिचा मृतदेह आढळून आला. यशश्रीचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. तिच्या कमरेवर व पाठीवर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा होत्या.
या घटनेनंतर पोलिसांनी दाऊदचा शोध घेण्यासाठी 4 टीम तयार करण्यात आल्या होत्या. उरण पोलिसांची दोन पथके कर्नाटकात गेली होती, तर दोन पथके महाराष्ट्रात आरोपीचा शोध घेत होती. दरम्यान, उरण पोलिसांनी कर्नाटकातून मोहसीन नावाच्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन हाही यशश्री शिंदेच्या संपर्कात होता, त्यामुळे दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी दाऊद शेख आणि यशश्री यांच्यात याच मुद्द्यावरून भांडण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. उरण पोलिसांचे पथक मोहसीनचीही चौकशी करत आहे.
यापूर्वी या प्रकरणाशी निगडीत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात आरोपी दाऊद मृत तुरणीचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. मृत तरुणीचा मृतदेह उरणच्या खाडीत सापडला होता. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुंटबीयांनी पोलिसांकडे नोंदवली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी उरणमध्ये मिळालेल्या मृतदेहाची तपासणी केली आणि मृत तरुणीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर हे हत्या प्रकरण समोर आले होते.