शिंदे गटाच्या चार जणांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तापेचावर महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुरुवारी बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील जनतेचा आदर ठेवून, त्यांचा संपूर्ण सन्मान करूनच भाजप मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्याच्या गृहखात्यासह 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांना मंत्रिपद न देणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. तानाजी सावंत यांचा कुठल्याही परिस्थितीत मंत्रीमंडळात समावेश झाला पाहिजे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. दुसरीकडे भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून त्यांना मंत्रिपद द्यावे लागले तर दीपक केसरकर यांना थांबावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उदय सामंत आणि दीपक केसरकर हे कोकणातील दोघे मंत्री असताना गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास ही संख्या तीन होणार आहे. त्यामुळे आता या चार नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरूनही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस होऊ शकते. आता एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर या नेत्यांचे भविष्य अवलंबून आहे.