रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बने उडवण्याची धमकी
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. काल दुपारी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर धमकी देणारा ई-मेल आला. हा ईमेल रशियन भाषेत पाठवण्यात आला असून त्यात रिझर्व्ह बँकेला उडवून देण्याची चर्चा आहे. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातही मिळाली होती धमकी : यापूर्वी गेल्या महिन्यात 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर धमकीचा फोन (Threatening Call To RBI) आला होता. फोनवरील व्यक्तीनं तो ‘लष्कर-ए-तोयबा’चा सीईओ असल्याचं सांगत मागचा रस्ता बंद करा, अशी मागणी केली. इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असं म्हणून फोन ठेवला. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीनुसार माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात होता.
दिल्लीतील चार शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी : दुसरीकडं दिल्लीतील 4 शाळांना देखील आज (13 डिसेंबर) बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी ई-मेल करुन देण्यात आली आहे. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अद्याप काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळं ही धमकी खोटी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.