महाराष्ट्रराजकारण

छ. संभाजीनगरात ठाकरेच्या उमेदवाराचा शिंदे गटाला पाठिंबा, ऐनवेळी घेतली माघार

छ. संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर, येथील जागेवरुन शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघातून एमआयएमने नासेर सिद्दिकी यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, येथील लढत तिरंगी होत असल्याचं दिसून येतंय. मात्र ऐनवेळी ठाकरेनी उमेदवारी जाहीर केलेल्या तनवाणी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, ठाकरेंनी तनवाणी यांच्यावार कारवाई करत येथील उमेदवार बदलला आहे.

शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतल्याने शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी येथून जाहीर करण्यत आली. त्यामुळे, येथील मतदारसंघात महविकास आघाडीच्या बाळासाहेब थोरात विरुद्ध प्रदीप जैस्वाल यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान, शिवसेना युबीटीचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची तातडीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून कार्यमुक्तीही करण्यात आलीय. सदरील सर्व घोषणा मातृभूमी प्रतिष्ठाण संपर्क कार्यालयात आयोजित अधिकृत पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना सचिव अशोक पटवर्धन, सह संपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे व महानगरप्रमुख राजु वैद्य उपस्थित होते. त्यामुळे, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वीच मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. दरम्यान, अरे बापरे आता एका उमेद्वारामुळे मुख्यमंत्री शिंदेंचे 288 जागा निवडून येतील असं वाटतंय. निवडणुकीत अशा पळवापळवी होत असतात. मुख्यमंत्री आणि पोलिसांचा दबाव असतो. चिंता करण्याचं कारण नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एमआयएमचा उमेदवार विजयी होऊ नये म्हणून माघार
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती आहे, म्हणजे येथून एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक धक्के या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. त्यातच, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी किंवा राजीनाम्याचे प्रकार घडत असताना, चक्क उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button