दर्शनाला येतानाही माझी बॅग तपासली, विनाेद तावडेंना सूट कशी काय : उद्धव ठाकरे
विरार : हॉटेल विवांता येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोपावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आहे. त्यामुळे विनोद तावडे जवळपास तीन तासांपासून हॉटेलमध्येच अडकून पडले आहेत. तिथे काही डायऱ्या सापडल्या असून त्यात काही नोंदी असल्याचाही दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रातील खोकासूर आणि भ्रष्टासूरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, असं साकडं मी तुळजाभवानीच्या चरणी घातलं आहे, मला खात्री आहे, आई तुळजाभवानी आशीर्वाद देणारच. तुळजाभवानीच्या दर्शनाला येतानाही माझी बॅग तपासली गेली. बॅगेत तर काही सापडलं नाही, विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याचं आताच तुमच्याकडून समजलं. तसंच काल अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला, तो दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं? म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे, भ्रष्ट राजवट एकदा या राज्यातून खतम करुन टाक, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
“भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!” असे ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.ं