धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत छगन भुजबळचे रोखठोक मत
नाशिक : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर संशय असल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता विरोधकांच्या या मागणीवर ओबीसी नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केले आहे. तसेच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भुजबळ यांना पत्रकारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन आपल्याला मंत्री करणार असल्याच्या चर्चा आहेत,असे म्हटले. त्यावर उत्तर देतांना भुजबळ म्हणाले की,”मी याआधीही सांगितले आहे की मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावे, असे माझ्या स्वप्नातही येणं शक्य नाही. दुसरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की, पूर्ण चौकशी केल्यानंतर ते आका काय किंवा काका काय, जे कोणी लहान मोठे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, त्याआधीच आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत आहोत? चौकशीत काही बाहेर आले आहे का? असा सवाल भुजबळांनी यावेळी केला. तसेच जोपर्यंत कन्फर्म होतं नाही, तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले.
तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणीतील मूक मोर्चात बोलतांना मंत्री धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही, असे म्हटले होते. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया देत मनोज जरांगेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “याठिकाणी लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचे उपोषण सोडवायला चार ते पाच वेळा धनंजय मुंडे गेले होते ते एकमेकांना ओळखतात”, असे म्हणत छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
तसेच पुढे भुजबळ यांनी तेलगी प्रकरणात दिलेल्या राजीनाम्याबाबत देखील खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “मी ही अशा प्रकरणातून गेलो आहे. २००३ मध्ये तेलगीला पकडलं मी, त्याच्यावर मोक्का दाखल केला मी. मात्र, माझ्यावर आरोप लागल्यावर माझा राजीनामा घेण्यात आला. तेव्हा मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. त्यानंतर मीच सर्वोच्च न्यायालयात गेलो, सीबीआयकडे केस दिली. त्यावेळी केंद्रात वाजपेयी सरकार होते, काही नसताना खूप मनस्ताप झाला. मात्र,२००४ मध्ये पवारसाहेबांनी पुन्हा मंत्री केले, मी कारण नसताना भोगले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली चौकशी सुरू आहे. चौकशीत सापडल्यावर मुख्यमंत्री त्यांना काय सांगायचे ते सांगतील”, असे भुजबळ यांनी म्हटले.