छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग; साल्यानंतर सासरा आणि साथीदारालाही अटक

छत्रपती संभाजीनगर : इंदिरानगरात आंतरधर्मीय प्रेमविवाहातून झालेल्या खून प्रकरणात जवाहरनगर पोलिसांनी दुसरा आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदाराला जालना येथून अटक केली आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या तीन झाली आहे. अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही याला शनिवारी अटक केली होती. रविवारी पोलिसांनी सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही आणि त्याला मदत करणाऱ्या स्वप्नील पटेकर (२८, रा. जालना) या दोघांना अटक केली.
मृत अमित साळुंके याने २ मे रोजी विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्याशी पुण्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला विद्याच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे अमित आणि विद्या हे महिनाभर पुण्यात राहिले. मात्र, गीताराम आणि अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्या धमक्या सुरूच होत्या. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला गाठून मारले तर मदतही मिळायची नाही. त्यामुळे अमितच्या कुटुंबीयांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरात बोलावून घेतले. लग्न होऊन अवघे अडीच महिने होताच गीताराम आणि अप्पासाहेब कीर्तिशाही यांनी १४ जुलैच्या रात्री अमितला गाठले आणि चाकूने भोसकले. त्याच्या पोट आणि मांड्यावर आठ वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाला. घाटीत उपचार सुरू असताना २५ जुलैला अमितने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर साळुंके कुटुंबीय आक्रमक झाले. त्यांनी जवाहरनगर ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत ठिय्या देत पोलिसांना धारेवर धरले होते. त्यानंतर १४ जुलैपासून पसार असलेल्या दोन्ही आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांनाही पोलिसांनी आता अटक केली आहे. या आरोपींना १ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.