पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री
महाराष्ट्रात संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. सिन्नरमध्ये हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज एकाच मंचावर होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला असून छ. संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. रामगिरी महराजांना अटक करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाने केली.
रामगिरी महाराज यांनी या वक्तव्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. ‘बांगलादेशात कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत, अनेक बांगलादेशी भारताच्या सीमेवर उभे असून भारतात आश्रय मागत आहेत. बांगलादेशमध्ये जे घडलं ते उद्या आपल्या देशात घडायला नको, हिंदूंनी सुद्ध मजबूत राहायला हवं, आपण अन्यायाला प्रतिकार करायला हवं असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलंय.
वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. जमावाकडून रामगिरी महाराजांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रामगिरी महाराजांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. रामगिरी महाराज यांच्याविरोधात येवला आणि वैजापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकिकडे रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असताना त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महंत रामगिरी महाराजांच्या कामांचं कौतुक केलं. रामगिरी महाराजांनी अनेक कुटुंबांना दिशा दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.