काँग्रेसची विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर, औरंगाबाद पूर्वमध्ये देशमुख ऐवजी लहू शेवाळे यांना उमेदवारी
मुंबई : काँग्रेसने रविवारी रात्री आपल्या १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून जाहीर केलेल्या मधुकर देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अंधेरी पश्चिम मतदारसंघातून सचिन सावंतऐवजी अशोक जाधव यांचे नाव आले आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या ९९ इतकी झाली आहे.
या यादीनुसार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली असून त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातील गतवेळचे उमेदवार अशोक जाधव यांनाच पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून जाहीर केलेल्या मधुकर देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सावंत हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु त्यांना अंधेरी पश्चिममधून तिकीट जाहीर झाल्याने त्यांनी उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर काँग्रेसने हा बदल केला आहे. सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने, पंढरपूरमधून माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.