प्रचारासाठी काँग्रेसचा उमेदवार थेट भाजप कार्यालयात, जेष्ठ नेत्याचा घेतला आशिर्वाद
नागपूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने जोर धरलाय. सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं सध्या प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारामध्ये अनेक रंजक घटना ही घडतात. नागपूरमध्ये प्रचारादरम्यान घडलेल्या एका घटनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडून बंटी शेळके तर भाजपाने त्यांच्याविरोधात प्रवीण दटके यांना आखाड्यात उतरवले आहे. या मतदारसंघात चुरशीचा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. प्रचाराच्या धुमधडाक्यात बंटी शेळके यांच्या एका कृतीने सर्वच जण अवाक झाले. ते पळत पळत थेट भाजपाच्या प्रचार कार्यालयात घुसले.
तिथे असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांशी त्यांनी हस्तांदोलन तर केलेच. पण एका ज्येष्ठ भाजप नेत्याचे आशीर्वाद सुद्धा त्यांनी घेतले. इतकेच नाही तर मनात कोणतीही कटुता न ठेवता भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिला. मोहब्बत की दुकानची ही कृती सर्वांनाच आवडत आहे. या घटनेचा व्हिडीओ खुद्द बंटी शेळके यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर टाकला आहे.
दरम्यान बंटी शेळके आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची ही कृती अनेकांना भावली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.