क्राइममहाराष्ट्र
सांगोला तालुक्यात बांधकाम कामगारांची खाजगी एजंटाकडून ‘लूट’
गोळा केलेल्या 'मलिदयाचे' वाटेकरी शोधण्याची मागणी

सांगोला : प्रतिनिधी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यावतीने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. परंतु सांगोला तालुक्यात मात्र याच कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देतो, असे म्हणून खाजगी एजंट व दलाल स्वतःचे ‘आर्थिक कल्याण’ साधत असल्याची चर्चा होत आहे.
बहुतांश बांधकाम कामगार हे साक्षर नाहीत तसेच शासकीय योजनांची सविस्तर माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा घेत खाजगी एजंट गेल्या काही महिन्यांपासून अधिक सक्रिय झाले असून विविध योजनांचा लाभ गावातच मिळून देतो, सोलापूरला हेलपाटे मारू नका, असे म्हणून ‘मलिदा’ गोळा करत आहेत. कामगार नोंदणी करायची म्हणून सुमारे १००० ते १५०० रुपये आणि साहित्य मिळवण्यासाठी १००० ते १२०० रुपये मागितले जात असल्याची चर्चा होत आहे. गोरगरीब कामगारांच्या ताटातील घास गिळण्याच्या ह्या प्रकारमुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची असणाऱ्या खऱ्या कामगाराला मात्र पोटाला चिमटा घ्यावा लागत आहे. काबाड कष्ट करून जगणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या ‘खाजगी एजंटांना’ नक्की आशीर्वाद कोणाचा आहेत याची चौकशी व्हावी आणि कुंपणाचं शेत खात नाही ना, याची शासनाने गोपनीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी लवकरचं प्रहार संघटना, सांगोला यांच्याकडून कामगार मंत्री यांच्याकडे केली जाणार असल्याचे खात्री लायकवृत्त आहे.
नाव शिबिराचे ; कार्यक्रम स्व: कल्याणाचे
कमलापूर ता. सांगोला येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी काही खाजगी एजंटांनी ‘समाजसेवेच्या’ एका उपक्रमाच्या नावाखाली बांधकाम कामगारांकडून योजनेचा लाभ मिळवून देतो, म्हणून पैसे गोळा केले असल्याची चर्चा सांगोला तालुक्यात होत आहे.