अवैध गोमांसाच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा
१६ टन गोमांस आणि नऊ वाहने असा ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, धुळे-सोलापूर हायवेवरील जांभाळा येथे शेडमध्ये सुरू होता कारखाना

छत्रपती संभाजीनगर : जांभाळा शिवारातील इकरा ट्रेडिंग अँड कोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनी आणि वेगवेगळ्या ९ वाहनांमधून गुन्हे शाखेने सुमारे १६ टन २ क्विंटल ७० किलो गोवंश मांस जप्त केले. पोलिसांनी सुमारे ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दौलताबाद ठाण्यात २९ जणांविरुद्ध वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत.
इकरा ट्रेडिंग अँड कोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनीचा संचालक, मालक मोहंमद नाजीम उस्मान कुरेशी (सिल्लेखाना), लियाकत रज्जाक शेख (रा. पेन्शनपुरा, हिंगोली), साजीद अहेमद अब्दुल जलील (रा. कारंजा लाड, जि. वाशिम), अकील हबीब शेख (रा. मुंब्रा, ठाणे), अजीम सुलतान कुरेशी (सिल्लेखाना), आत्तर कुरेशी, आशपाक (रा. बीड) आदींसह व्यवस्थापक शेख जाकीर शेख रशीद (५१, रा. ज्युबली पार्क), वॉचमन शेख जमील अब्दुल (३६, रा. जांभाळा), साफ सफाई कामगार शेख सद्दाम शेख हरुण (२८, रा. वकोद, ता. रिसोड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील व्यवस्थापक, वॉचमन आणि सफाई कामगार अटकेत आहेत.
अशपाक मुश्ताक कुरेशी, खाजा मुसा कुरेशी, कैफ खान महेमूद खान, सद्दाम इसाक कुरेशी, फरदीन निसार कुरेशी, अलताफ जलाल शेख, शकील अहेमद कुरेशी, अजहर अजीज कुरेशी, फिरोज अन्सार देशमुख, सिराज चौधरी, अजद कुरेशी, रिजवान शेख, अशफाक शेख, नदीम चौधरी, सय्यद जुबेर, मन्नू आदींचा समावेश आहे.
जांभाळा शिवारातील इकरा ट्रेडिंग अँड कोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनीत अवैधरित्या गोवंश मांस साठवणूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक विनायक शेळके, काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, विशाल बोडखे, यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद खताळ, मदन अंतराये, पशुधन विकास अधिकारी डॉ. स्मिता इंगळे, अन्न औषधी निरीक्षक प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छापा मारला. रात्री १२ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. तेथून सव्वाचार लाखांचे ४ टन १ क्विंटल गोवंश मांस आणि ते मांस एक्सपोर्ट करण्यासाठी वापरले जाणारे सव्वादोन लाखांचे बॉक्स जप्त केले. या प्रकरणी सहायक फौजदार सतीश जाधव यांच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा दाखल केला.
त्याचवेळी धुळे-सोलापूर महामार्गावरून गोवंश मांसाची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची खबर आल्यावर याच पथकाने कारवाई करीत २६ लाखांची ९ वाहने पकडून २४ लाख ३४ हजार रुपयांचे १२ टन १ क्विंटल ७० किलो गोवंश मांस आणि ७५ हजारांचे ९ मोबाइल, असा ५० लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.