Crime Story : किती दिवस जगायचं पांडुरंगला घाबरून ! त्यापेक्षा तिघांनी त्यालाच टाकले मारून!

नाशिक : पांड्या उर्फ पांडुरंग हनुमंत शिंगाडे आणि विकास हनुमंत शिंगाडे हे दोन भाऊ भद्रकाली परिसरातील दुर्गा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पंचशील नगरामध्ये आई पुष्पा हिच्यासोबत रहात होते. पांडुरंग हा गुन्हेगार वृत्तीचा आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्याला नाशिक शहरातून तडीपार करण्यात आले होते.
पांडुरंग याचे तीन मित्र आहेत. निखिल सच्चे, कैलास गायकवाड आणि एक अल्पवयीन मुलगा आहे. हे तिघे जण पांडुरंग याचे जवळचे मित्र आहेत. पांडुरंग हा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. त्याला दारू पिण्याची सवय आहे. वयाने मोठा असल्याने तो निखिल, कैलास आणि त्या अल्पवयीन मुलावर सतत दादागिरी करायचा. त्यांच्याशी भांडण करून मारहाणही करायचा, शिवाय दारू पिण्यासाठी त्यांच्याकडून दादागिरी करून पैसे काढून घ्यायचा. पैसे दिले नाही तर त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमबाजी करायचा शिवाय मारहाणही करायचा.
वैतागून या तिघांनी त्याला दारू प्यायला पैसे दिले तरीही काहीतरी कुरापत काढून तो त्यांच्याशी भांडायचा. आपल्याच पैशावर दारू पिवून हा आपल्याशी भांडण करतो शिवाय मारहाण करतो. इतकेच नाही तर ठार मारण्याच्या धमक्याही देतो, त्यामुळे पांडुरंगचे हे तीन मित्र धास्तावले होते. पांडुरंग हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे, तो काय करेल याचा नेम नाही अशी त्यांना भीती वाटत होती. ते तिघे नेहमी त्याच्या दहशतीखाली रहात होते. त्याला घाबरून रहाण्यापेक्षा त्यालाच संपवावा असा विचार त्या तिघांच्या डोक्यात घोळू लागल्यामुळे या तिघांनी पांडुरंग शिंगाडे यालाच ठार मारण्याचा निर्णय घेतला. ते त्याच्यावर पाळत ठेऊन होते. संधी मिळताच त्याचा काटा काढायचा हे त्यांनी पक्के केले होते.
शुक्रवार दि. ५ जुलै २०२४ रोजी पांडुरंग याचा मावस काका कोंडाजी कढाणे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी दि. ४ जुलै २०२४ रोजी पांडुरंग हा रात्री १० वाजता आपल्या पंचशील नगरातील घरी आला होता. दरम्यान, कोंडाजी कढाणे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या घरी दि. ४ जुलै २०२४ रोजी रात्री जागरणाचा कार्यक्रम असल्याने पांडुरंग, त्याचा भाऊ विकासव आई पुष्पाबाई असे सर्व जण त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या मावशीच्या घरी गेले होते.
रात्री १ वाजण्याच्या सुमारास तिघे जण घरी येवून झोपी गेले. पांडुरंगचे मित्र निखिल सच्चे, कैलास गायकवाड व त्यांचा अल्पवयीन जोडीदार असे तिघे जण त्याला मारायला टपलेलेच होते शिवाय ते त्याच्या मागावर होते.
पांडुरंग घरी येवून झोपला असल्याचे पाहून निखिल, कैलास व अल्पवयीन मुलगा असे तिघे जण हातात कोयता व चॉपर घेवून पांडुरंगच्या घराच्या खिडकीजवळ गेले. खिडकी मोठी असल्याने त्यातून आत शिरता येणे शक्य होते. याचाच फायदा घेत ते तिघे त्याच्या घरात घुसले. पांडुरंग गाढ झोपेत होता. ही संधी साधत त्या तिघांनी झोपेत असलेल्या पांडुरंगवर हत्यारांनी हल्ला चढवला. कैलास व इतर दोघे जण त्याला मारहाण करू लागले. कैलासने कोयत्याने पांडुरंगच्या डोक्यात व छातीवर वार केला. दुसऱ्याने चॉपरने त्याच्या बरगडीवर मारले.
तिसऱ्याने कोयत्याने पांडुरंगवर वार केल्याने तो जोरजोरात ओरडू लागला. त्याच्या आवाजाने शेजारी झोपलेल्या विकासला जाग आली. तो जागा झाला, तेंव्हा तिघे जण पांडुरंगला कोयता व चॉपरने मारहाण करत असल्याचे त्याने पाहिले. एकाने पांडुरंगला धरून ठेवले तर दोघे जण त्याच्यावर कोयत्याने व चॉपरने वार करत होते. विकास जागा झाल्याचे दिसताच कैलासने त्याला दमबाजी केली की, ‘तू आवाज करू नकोस, नाही तर तुलाही आम्ही कोयत्याने मारू’ त्यामुळे विकासला गुपचूप बसावेलागले. त्याचवेळी घरात होणारा आरडाओरडा ऐकून पांडुरंगची भाची माधुरी त्यांच्या घरात आली, तेंव्हा मात्र निखिल, कैलास व त्यांचा अल्पवयीन जोडीदार असे तिघे जण तिला धक्का देवून दरवाजातून आणि खिडकीतून उडी मारून पळून गेले. तिने पळून जाणाऱ्यापैकी निखिलला ओळखले, कारण तो पांडुरंगचा मित्र होता हे तिला माहित होते.
तिघांनी कोयता व चॉपरने क्रूरपणे वार केल्याने पांडुरंग जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्यावेळी पहाटेचे साडेतीन वाजले होते. तिघांनी पहाटेची वेळ निवडून पांडुरंग शिंगाडे याच्यावर हल्ला चढवला होता. रक्तबंबाळ झालेल्या व शेवटचा घटका मोजणाऱ्या पांडुरंगला विकास, त्याची मावशी कुसुम जाधव व इतर लोकांनी रिक्षात घेऊन उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे आणले, मात्र उपचार होत असतांना त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एच. पवार हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा पोलिसांनी केला.पांडुरंगचा भाऊ विकास हनुमंत शिंगाडे याने दिलेल्याफिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्याला निखिल सच्चे, कैलास गायकवाड व त्यांचा अल्पवयीन साथीदार या तिघांविरोधात गुन्हा रजि. नं. २३१/२०२४ ला भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१ (३) ३५ (२), ३ (५) व १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरूवात केली.
पोलिसांनी माहितीच्या आधारे तपास करत व तांत्रिक पद्धतीचा वापर करून चौकशी केली असता आरोपी हे सातपूर परिसरात असल्याचे लक्षात येताच गुन्हे शोध पथकाने सातपूर परिसरातून कैलास नंदू गायकवाड रा. पंचशील नगर, भद्रकाली व एका विधीसंघर्षीत बालकास अटक केली, तर कैलास उर्फ ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड याला पंचशीलनगरातून अटक करण्यात आली.