खराब रस्ता, त्यात ट्रॅक्टरने प्रवास; प्रसुतीनंतर उपचारासाठी जाताना वाटतेच महिलेचा मृत्यू!
भेंडाळा : गंगापूर तालुक्यातील पखोरा येथील महिलेचा प्रसूतीनंतर दवाखान्यात उपचारासाठी जात असताना खराब रस्त्यामुळे मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, दि ११ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. स्वाती प्रमोद पदार (वय २६) असे मयत महिलेचे नाव आहे.
रविवारी सकाळी स्वाती यांनी गोंडस बाळास जन्म दिला. परंतु प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाल्यामुळे सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर कुटुंबीयांनी स्वाती यांना गंगापूर येथील जिल्हा उप रुग्णालय येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहन नसल्यामुळे स्वाती यांच्या कुटुंबीयांनी ट्रॅक्टरचा आधार घेतला. परंतु खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर हा दोन वेळेस फसला आणि उपचारास विलंब झाल्याने स्वाती यांना रस्त्यातच प्राण गमवावा लागला. गंगापूर जिल्हा उपरुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने पखोरा परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. अगदी एकही दिवस न झालेल्या बाळाला सोडून स्वाती यांनी जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेने माय लेकरांची कायमची ताटातूट झाली असून परिसरात शोकमय वातावरण आहे. स्वाती यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा व एक अर्भक अवस्थेतील मुलगा असा परिवार आहे.