पाळणा व्यवसायिकास मारहाण करून खंडणी मागितली; सांगोला पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगोला (प्रतिनिधी):-
तुम्हाला सांगोला यात्रेत पाळणे लावायचे असतील तर मला एक लाख रूपये दयावे लागतील, नाही तर तुम्हाला यात्रेत पाळणे लावू देणार नाही व पाळणे चालु देणार नाही असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करत १ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सांगोला पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिनांक २९ जानेवारी रोजी अंजुबाई सोपान इंगोले (वय ७५) पाळणा व्यवसायिक, रा. वाढेगाव ता. सांगोला यांनी निखील गडहिरे रा. भिमनगर सांगोला ता. सांगोला व एक अनोळखी व्यक्ती अश्या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा यात्रेमध्ये पाळण्याचा व्यवसाय असून, महाराष्ट्रामध्ये व राज्याच्या बाहेर यात्रेच्या ठिकाणी जाऊन पाळण्याचा व्यवसाय करतात.
दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांनी सांगोला येथे मार्केट यार्डमध्ये अंबिका देवी यात्रा कमिटीकडून पाळणे लावण्यासाठी जागा भाडेतत्वाने घेतली असता, सदर ठिकाणी पाळणे बांधण्याचे कामकाज चालू होते.
सदर ठिकाणी निखील गडहिरे व त्याच्या सोबत एक अनोळखी व्यक्ती पाळण्याच्या ठिकाणी आला व त्यांनी मोठ्याने आरडाओरड करून, तुम्ही कोणाच्या परवानगीने पाळणे लावत आहेत. तुम्हाला या ठिकाणी पाळणे लावायचे असतील तर मला एक लाख रूपये दयावे लागतील, नाही तर तुम्हाला मी यात्रेत पाळणे लावू देणार नाही व पाळणे चालू देणार नाही असे म्हणाला.
यावेळी फिर्यादी त्यास म्हणाल्या की, मागच्या वर्षीं तुला आम्ही स्वखुशीने ३० हजार रूपये दिले होते, यावेळेस एक लाख रूपये फार होतात. आम्हाला एवढे पैसे देणे परवडणार नाही तसेच आम्ही यात्रा कमिटीकडून रितसर जागेचे भाडे देऊन पाळणे लावत आहे, त्यामुळे आम्ही तुला पैसे देणार नाही.
फिर्यादी यांचा मुलगा नवनाथ याने सुध्दा निखील गडहिरे यास समजावून सांगण्यास सुरूवात केली असता, निखील गडहिरे व एक अनोळखी व्यक्तीने, फिर्यादी व मुलगा नवनाथ यांना हाताने लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. फिर्यादी यांच्या भाच्याची पत्नी कमळाबाई चव्हाण ह्या भांडण सोडविण्यास आल्या असता, तिला सुध्दा हाताने मारहाण करून शिवीगाळी दमदाटी केली.
जर तुम्ही मला पैसे दिले नाही तर मी तुम्हाला पाळणे लावू देणार नाही व चालु देणार नाही. तसेच पैसे नाही दिले तर तुझ्या मुलांना गाडीखाली चिरडुन मारून टाकीन अशी धमकी देऊन तेथून निघुन गेले, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
यात्रा कालावधीत पोलीसांचे २४ तास लक्ष :- पो.नि.भीमराय खणदाळे
श्री अंबिका देवी यात्रा सुरू होत असून सांगोला पोलिसांचे यात्रा कालावधीत २४ तास सर्वत्र लक्ष असणार आहे.
व्यापारी, व्यवसायिकांनी आनंदाने आपले व्यवसाय करावेत. यात्रेत येणाऱ्या महिला भगिनी व नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी पोलीस घेणार आहेत. तसेच बेशिस्तपणा व गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.