बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. मात्र, वाल्मिक कराडवरही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा, अशी मागणी देशमुख कुटुंबासह मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
यावरुन विरोधक आणि देशमुख कुटुंबीयांना आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील सहभागी झाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने, आंदोलने करण्यासाठी जमावाला परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
सध्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा-1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहे.