आक्षेपार्ह वक्तव्य करणे देशमुख यांना भोवले, पोलिसांनी केली अटक

अहमदनगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे वसंतराव देशमुख यांना चांगलेच भोवले आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते, पोलिसांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या बाहेर असताना ताब्यात घेतले. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे.
काय म्हणाले होते देशमुख
संगमनेर येथे सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा सुरू असताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रत वक्तव्य केलं. ते म्हणाले, “भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात. माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळ्या तालुक्याला माहिती आहेत”, असं वसंतराव देशमुख सभेत म्हणाले.
संगमनेरमध्ये तापले होते वातावरण
जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी 8 तास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप देखील केला जात होता.
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल
जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकऱणी विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर वसंतराव देशमुखांचा शोध घेतला जात होता, मात्र ते फरार झाले होते, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.