फडणवीसांची शिवरायांच्या मंदिरात जायची हिंमत आहे का…
मुंबई : उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या सभेमध्ये महायुतीच्या सरकारच्या काळात मालवणमधील समुद्र किनाऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारु असं सांगितलं. यावर प्रत्त्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा असं आव्हान केले. या मुद्द्यावरुन पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
राऊत काय म्हणाले?
“महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारु असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. लोक त्याला प्रतिसाद देत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखणं सहाजिक आहे. फडणवीसांनी या संकल्पनेची चेष्टा केली. फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला,” असं राऊत म्हणाले. “उद्धवजी सांगत आहेत की मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारेल. तेव्हा शिवरायांच्या भ्रष्टाचार घडवून आणणाऱ्या फडणवीसांनी त्यांची खिल्ली उडाली. आधी तुम्ही मुंब्र्यात उभारा, असं ते म्हणाले. अरे मुंब्रा काय पाकिस्तानात उभारु. फडणवीसांना माहितीये का, मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे. कधी गेलेत का ते मुंब्र्यात? मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एखाद्या मंदिरासाखाच आहे. तुम्ही या देशातील मुस्लिमांचा अपमान करत आहात. बटेंगे तो कटेंगे हे तुमचं धोरण चालत नाही तर अशाप्रकारे राबवताय,” अशा शब्दांमध्ये राऊतांनी निशाणा साधला.
“तुम्ही अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होता काय झालं? तुमच्या चेष्टेखोर भूमिकेमुळे स्मारक होऊ शकलं नाही. तुम्ही सांगाल तिथे आम्ही शिवरायांची मंदिरं बांधून देऊ. तुमची हिंमत आहे मंदिरात यायची?” असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.