महाराष्ट्रराजकारण

लढण्याची हिंमत जयंत पाटील यांच्यात आहे का : पडळकर

सांगली : आमदार बनल्यानंतर प्रथमच गोपीचंद पडळकर यांचा सांगलीच्या आटपाडी येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीत आता सरकार विरोधात लढण्याची हिंमत नाही, अशी टीका त्यांनी केली.

“सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत, त्यांच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची? हे रक्तात असावे लागते, हे लोक लगेच वळचणीला पळतात, त्यामुळे हे लढूचं शकत नाही. आता आपण चिंता करायची नाही, वळचणीला कोण जात असतात. साप, उंदीर पण वाघ कोणाच्या वळचणीला जात नाही,” असा टोला देखील पडळकरांनी लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना आमचे १०५ आमदार होते. एकही आमदार देवा भाऊ यांच्या पाठिमागून हटला नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता विचारावर काम करतो. तो संधी साधू असू शकत नाही. अडीच वर्ष जयंत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री होते, पण जिल्हा नियोजन बैठकीला येण्याआधी, मी येणार आहे का नाही, हे माझ्या आमदार मित्राला फोन करून विचारायचे, असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

विरोधक पण स्ट्राँग पाहिजे…
“अधिवेशन झालं, पण कोणी विरोधक मोठ्याने बोलायला तयार नाही, त्यामुळे ते तिकडे आहेत की, आमच्याकडे आहेत, हे कळेना. काँग्रेसवाले तर प्रश्न पण उपस्थित करतात आणि उत्तर पण तेच देतात, त्यामुळे ते सगळे हवालदिल झाले आहेत, काहीच दम नाही. विरोधक पण स्ट्राँग पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही, पुढे कोणाचं स्ट्रॉंग दिसत नाही,” असा टोला पडळकर यांनी लगावला.

“लोक म्हणतात महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण हे सगळं थोतांड आहे. महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालतो हे फक्त भाषणात सांगण्यापुरतं आहे. हे राज्य प्रचंड जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही. पण आता जाती-जातीतील भिंती तोडून काम करावे लागेल. गावा-गावात एकत्र यावे लागेल आणि वैचारिकपणे काम करावे लागेल,” असं गोपीचंद पडळकर भाषणात म्हणाले.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता आपल्याला काम करायचे आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असल्याचेही पडळकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button