सांगोला (प्रतिनिधी):-
कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटेत थांबलेल्या पिकअपला भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात डिकसळ ता . सांगोला येथील श्री लक्ष्मी देवी नवरात्र उत्सव मंडळाचे १२ तरुण जखमी झाले, असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यात सत्याजित विष्णू यादव(वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे.
सदर घटना गुरुवार पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास विजापूर – गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली येथे घडली आहे.
विजय कांबळे, आबासो पारसे, संजय जगताप, अविनाश काळे, विश्वास पाटील, चैतन्य जाधव, सचिन कारंडे, विकास करांडे यांच्यासह आणखी तीन जण जखमी झाले आहेत. यांच्यावर जत येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर अपघाताची माहिती मिळताच नाना हालंगडे, माजी सरपंच चंद्रकांत करांडे यांनी जखमींना तातडीने उपचाराकरता दवाखान्यात दाखल करून मदत केली.