एकनाथ शिंदे सत्तेत, हेच खूप झाले : बच्चू कडू

मुंबई : रवि राणा यांच्याकडून विधानसभेत दारूण पराभाव झाल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रथमच मुंबईत त्यांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. वाय. बी.चव्हाण सेंटर येथे ही बैठक त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख आणि उमेदवार यांच्यासह 60 ते 70 लोक या बैठकीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले असे म्हणून खोचक टोला लगावला.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा. त्यांनी चांगला कारभार करावा. शेतकर्यांची कर्ज माफीची घोषणा करावी. मला असे वाटते, एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे त्याचे लाडके शेतकरी करता येईल का? लाडका मजूर करता येईल का? लाडका दिव्यांग करता येईल का? हा विचार करावा, असे कडू म्हणाले.
‘एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले,’ असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत असे मत कडू यांनी व्यक्त केले. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाहीत, असे संकेत त्यांनी दिले.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर असं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिंदे नेमकी कोणती ऑफर स्वीकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावरच आता बच्चू कडू यांनी भाष्य करत शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.