एकनाथ शिंदे आता मोदी-शाहाचे लाडके भाऊ राहले नाही : राऊत
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला होता. त्यानंतर त्यांच्यात अन् देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार होती. मात्र या बैठकीआधीच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले होते. त्यांच्या बैठक रद्द करून निघून जाण्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे तडकाफडकी गावी निघून गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. याविषयी बोलताना,”महाराष्ट्राचा निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. निकालाबाबत लोकांच्या मनात संशय आहे. आता किती दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या दिवशी आपल्या गावाला निघून गेले. त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, पण ते कधी होणार? याची महाराष्ट्र वाट बघत आहे.” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
एकनाथ शिंदे हे काल अचानक आपल्या गावी निघून गेले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगले नाही. त्यांचा चेहरा पडलेला आहे. डोळ्यात चमक दिसत नाही. ते स्वतः म्हणताय मी सगळ्यांचा लाडका भाऊ आहे. पण ते आता मोदी, शाहांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत, वेगळा निर्णय ते घेणार नाहीत, त्याला हिंमत लागते, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
विधानसभा निवडणुकीतील मतांवर बोलताना संजय राऊत यांनी,”या राज्याच्या निकालाबाबत जगातल्या अनेक भागात संशय व्यक्त केला जात आहे. 76 लाख मतं कशी वाढली? नाना पटोले यांचा जो प्रश्न आहे तो आमचा पण प्रश्न आहे. रात्री साडे 11 पर्यंत कोण मतदान करत होतं? हाच फॉर्मयुला हरियाणामध्ये वापरला आहे. हरियाणात 14 लाख मतं वाढली. 76 लाख मतं अचानक वाढली ही मतं महायुतीच्या विजयाची शिल्पकार आहेत. लाडकी बहीण वगैरे काही नाही, ” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
संजय राऊत यांची राहुल गांधींशी चर्चा
संजय राऊत पुढे म्हणाले की, “माझं दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी बोलणं झालं. राहुल गांधी यांच्यासोबत माझं बोलणं झालं. जो निकाल लागला त्या विरोधात, ईव्हीएम विरोधात काय करायचे? यावर आमची चर्चा झाली. कायदेशीर मार्ग किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारायचा हे आम्ही ठरवू, “असेही त्यांनी म्हटले.