निवडणूक आयोग मोदीच्या दारातील कुत्रा : भाई जगताप
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला होता. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेण्यात आला आहे. यादरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसला आहे, असं विधान भाई जगताप यांनी केलं आहे.
भाई जगताप म्हणाले, “महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला तो अनपेक्षित आहे. महायुती सरकारने एवढे मोठे काही काम केले नव्हते. चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मी आधीपासून सांगत आलो आहे की, हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे. आज नाही तर उद्या यावर चर्चा व्हायलाच हवी. म्हणूनच काँग्रेसने पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे आवाहन केले आहे.”
पुढे ते म्हणाले, “जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. जर या लोकशाहीवर संशय घेतला जात असेल तर त्याचे उत्तर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला द्यावेच लागेल. निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर बसलेले श्वान आहे. केंद्रीय यंत्रणा लोकशाहीला बळकट करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्याचा दुरुपयोग सुरू आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कांड होत आहेत.”
यानंतर आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत भाई जगताप म्हणाले, “निवडणूक आयोग आभाळातून आलेला नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली असून कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही. आयोग हुजरेगिरी करत असल्यामुळेच मी त्यांच्यावर टीका केली. मी माझ्या विधानावर ठाम आहे.”
प्रवीण दरेकर काय म्हणाले?
दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसतात. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं असल्याने त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसेच दिसणार असल्याची टीका दरेकर यांनी भाई जगताप यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. एकनाथ शिंदे गटाला 57 जागांवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महायुतीचा आकडा हा 240 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही.