फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, फौजदाराचा शिपाई झालाय : संजय राऊत
मुंबई : आम्ही जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता, तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच महाराष्ट्रात शरद पवार यांनी दिलेल्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप केले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. आता वरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत यांनीदेवेंद्र फडणवीसांवर टीका करताना,”आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी नेमकं काय ठरवलं हे माझ्या इतकं कोणाला माहित नाही. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यातच झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये. त्यांना काहीच माहित नव्हतं,” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी,”आमचे सरकार बनत आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांना धक्का बसला होता, पडता पडता वाचले, कोसळले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे त्यांना समजल्यावर त्यांना वाटलं होतं शिवसेना काय करणार? आमच्या पायाशी येणार, अशी त्यांची भूमिका होती. मात्रा राजकारण शिवसेनेलाही येतं. आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून तुम्ही ते सरकार पाडलं. पाच वर्ष सरकार टिकावं अशी शरद पवार आणि आमची कमिटमेंट होती. त्यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालेले आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
आम्ही जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता, तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता. पक्षाने त्यांच्यासमोरच घोषणा केली होती. प्रत्येक सभेत सांगितले होते. त्यानंतर जर ते बदलत असतील तर ते बरोबर नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता यावरून देखील संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस सध्या गोंधळलेलं व्यक्तिमत्व आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झाला त्यामुळे वैफल्य आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाने अध:पतन केलं. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं.असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी, “25 वर्ष शिवसेनेबरोबर युती असताना तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीस खोटं बोलत आहेत. त्या प्रक्रियेत मी होतो मला माहित आहे ते कुठल्याही प्रकारची चर्चा करायला तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जात होतं. आमचं असं म्हणणं होतं की आपलं जे ठरलेले आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी,” असे संजय राऊत यांनी म्हटलंय.