मजा घ्या वरून फडणवीसांची जरांगे पाटलावर टीका
परभणी : मराठा आरक्षाणाच्या मुद्द्यावरुन परभणीत बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. परभणी जिल्ह्यातील दामपुरी गावात गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
त्यावेळी मनोज जरांगे पाटी म्हणाले की, काही लोक म्हणतात की, आता पहिले सरकार आहे, आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची… होऊ द्या आता… पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना. मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असे विधान मनोज जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले.
देवेंद्र फडणवीस यांची तिखट प्रतिक्रिया
“पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेन, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. आमच्या भूमिकेत कुठलेच अंतर नाहीये. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाहीये. जे निर्णय घेतले आहेत, तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ, तिघे मिळून घेऊ”, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर बोलताना दिले.
“मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर, मुस्लीम आरक्षण कसे देत नाहीत, हे बघतोच. २५ जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहे. मी राहो न राहो पण आरक्षणासाठी लढा देणार आहे”, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, २५ जानेवारी २०२५ पासून आम्ही आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. २५ जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल. २५ जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी आंतरवलीकडे यायचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.