भव्य रॅली काढत जरांगे पाटील यांच्या पाच शिलेदारांनी भरले सामुहिक उमेदवारी अर्ज

परभणी : मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून २५ इच्छुकांपैकी पाच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाच जणांपैकी ज्याला मनोज जरांगे पाटील उमेदवारी देतील, तोच अधिकृत उमेदवार असेल तर अन्य इच्छुक आपली उमेदवारी मागे घेतील, असेही त्यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे चांगलेच प्रस्थ आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तरुणांवर चांगला प्रभाव आहे, त्यामुळेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट मराठवाड्यासह महाराष्ट्रात जाणवला. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अस्पष्ट भूमिका घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीमध्ये सरकारला हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी मागणी देखील तरुण मराठा समन्वयकांनी केली होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सध्या मी राजकीय आखाड्यात उतरणार नसून मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरावे, अशा सूचना केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे पाथरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची काल बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये २५ इच्छुक उमेदवार समोर आले. पण सामूहिक निर्णय घेत पाच जणांचा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. आज पाथरी येथे भव्य अशी रॅली काढत मनोज जरांगे पाटील समर्थकांनी आपले पाच उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यानंतर जरांगे पाटील ज्याची उमेदवारी अधिकृत करतील केवळ त्यांचाच उमेदवार अर्ज कायम ठेवला जाणार आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडी कडून पाथरीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यातच महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये बंडखोरी देखील झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीमधील शिवसेनेचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष शहीद खान यांनी देखील बंड करत राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण अशातच मनोज जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी देखील चांगला जोर लावल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांची भव्य अशी रॅली पाथरी शहरातून सुरू होती ती रॅली तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर तेथे मनोज जडांगे पाटील समर्थक देखील मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची रॅली पाहताच मनोज जडांगे पाटील समर्थकांनी पाटील अशा घोषणा सुरू केल्या आणि आपले लाल रुमाल हवेमध्ये उडवत एकच जयघोष साजरा केला काही अनर्थ घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ दोन्ही जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला.
बापूराव रावसाहेब कोल्हे, प्राध्यापक नितीन रामराव लोहट, बालासाहेब तुकाराम पवळ, डॉक्टर जगदीश बालासाहेब शिंदे, मंचकराव सागरराव बचाटे, किरण राधाकिशन शिंदे, दादासाहेब रामराव ठेंगसे, अरुणराव सिताराम कोल्हे, मीरा कल्याणराव रेंगे, गोविंदराव घाडगे, अमोल भास्करराव भिसे, मुंजा ज्ञानदेव कोल्हे, नारायण काशिनाथराव अवचार अर्जुन रामराव भोगावकर अभिजीत अनंतराव कदम, डॉक्टर रामचित राव शिंदे, डॉक्टर राजेंद्र सुभाष कोल्हे