महाराष्ट्र

बीडमध्ये चार अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलिस अधीक्षकपदी नवनीत कावत

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर संतप्त लोकभावना लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी अल्पकालीन चर्चेदरम्यान केली. त्यानंतर २४ तासांच्या आत बीडला नवे पोलिस अधीक्षकही मिळाले आहेत. नवनीत कावत यांच्याकडे बीडच्या पोलीस प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

नवनीत कावत हे छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपआयुक्त पदावर कार्यरत होते. कावत हे धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या बदलीनंतरही सातत्याने गावकऱ्यांकडून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करत बीड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

4 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
यानंतर बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ते केज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.

पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की, बीडच्या प्रकरणात ज्यांचा समावेश असेल, मग तो भूमाफिया असेल, तरी त्यांच्यावर मकोका लावू. मी पोलिस महासंचालकांना देखील सांगितले की, यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय, हे बघायला पाहिजे. मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात. हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो. या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत. एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू. जी प्रकरणे समोर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

कोण आहेत बीडचे नवे SP नवनीत कांवत? 

नवनीत कांवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झालं. ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी, 11 वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी दहावीत अव्वल क्रमांक पटकावला. 12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी टेक केलं. त्यांची आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले जात होते, पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS अधिकारी बनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button