पोलीस आयुक्तांचे नाव वापरून फसवणूक, तरुणाला 10 लाखांचा गंडा

नवी मुंबई : सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब करत असल्याचे समोर आले आहे. यावेळी तर सायबर गुन्हेगारांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नावाचा वापर करुन पुण्यातील तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगारांकडून समोरच्या व्यक्तीला फोन करून वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवत पैसे उकळले जातात. पुण्यातील एका तरुणाला फोन करून नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे नाव सांगत मनी लॉन्ड्रिंग बाबत चौकशी करण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आला.
मुंबईतील फेडेक्स कुरिअर कंपनीमधून मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी मिलिंद भारंबे बोलतोय असे सांगत इराणला काय पार्सल पाठवले; अशी विचारणा केली. यातून बचाव करण्याच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अशा प्रकरणी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन जनतेला केले.