सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना आता मोफत उपचार

नवी दिल्ली : सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
देशातील ६.५ कोटी वृद्धांना याचा फायदा होणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. केंद्राच्या नव्या निर्णयानुसार, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिक त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना नवीन व स्वतंत्र आयुष्मान कार्ड दिलं जाणार आहे. देशातील सर्व ज्येष्ठ नागरिक या आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास (AB PM-JAY) पात्र असतील. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दर वर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल. जे ज्येष्ठ नागरिक सध्या केंद्र सरकारच्या कोणत्याही दुसऱ्या आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असतील तर त्यांना आयुष्मान भारत योजनेत स्विच करण्यचा पर्याय असेल.
केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजना 2017 साली सुरु केली. आयुष्यमान भारत योजनेनुसार देशभरातील निवडक सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचे 10 दिवस आणि नंतरच्या खर्चासाठी या योजनेमध्ये रिफंडचा नियम आहे. सध्या या योजनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे.